एसटी बसेसअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान खासगी वाहनांनाचा दररोजच्या भाड्याने पालक त्रस्त



तुमसर (भंडारा २८ डिसेंबर) : शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरीता एसटी उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे अशक्य झाले आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने नियम शिथिल केले. शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, त्यातच परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांकरिता संप पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जाणारी लाल परी थांबली. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे शहरात शिक्षणकरिता येण्याकरीता प्रवासाचे साधनच नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
खासगी वाहने संपूर्ण प्रवासी संख्या झाल्याशिवाय निघत नाहीत. त्यामुळे शाळा, कॉलेज, महाविद्यालय भरण्याच्या वेळेवरच विद्यार्थ्यांना खासगी वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच खासगी वाहनधारकांनी अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना दररोजचे भाडे देणे परवडत नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दैनंदिन भाड्याची रक्कम देणेही अशक्य झाले आहे. तर काही विद्यार्थ्यांनी शहरांमध्येच किरायाच्या घरात राहणे पसंत केले आहे.
लहान मुलांना धावपळ करीत दुचाकीवर सोडून देणे, दिवसभर कामे करणे तसेच शेतामधून आल्यावर त्यांना घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यामध्ये पालकांचीसुद्धा दमछाक होत आहे. प्रशासनाने वेळीच तोडगा काढून बसेस सुरू कराव्यात, विद्यार्थ्यांना पास देण्यात यावी, अशी मागणी तुमसर तालुक्यातील पालकांकडून होत आहे. लालपरी बंद असल्याने प्रवाशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. याचाच फायदा खासगी वाहन मालक, चालक घेत आहे. त्यांनी प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

टिप्पण्या